मुंबई – कोणताही आर्थिक व्यवहार तुम्ही डिजिटल करत असाल. तसेच डिजिटल माध्यमातील त्रुटी ओळखून सुधारणा करण्याची क्षमात तुमच्यात असेल, तर तुम्ही ४० लाख रुपये जिंकू शकता. ही कोणत्याही लॉटरीची सोडत नसून, तुमच्या कौशल्याचे बक्षीस किंवा कौतुकाची थाप आहे असे समजा. हे बेक्षीस देणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय). डिजिटल भरणा अधिक सुरक्षित तसेच ग्राहकांसाठी अधिक सुविधाजनक बनविण्यासाठी आरबीआयतर्फे पहिले जागतिक हॅकथॉन आयोजित करण्यात आले आहे.
हार्बिंझर २०२१ म्हणजे काय
आरबीआयतर्फे या हॅकथॉनची घोषणा करण्यात आली. डिजिटल भरणा अधिक सुरक्षित आणि तंदुरुस्त करणे हा यामागील उद्देश आहे. हार्बिंझर २०२१ या नावाने १५ नोव्हेंबरपासून हॅकथॉनची नोंदणी सुरू होणार आहे. या हॅकथॉनमध्ये सहभागी होणार्या स्पर्धकांना डिजिटल सुविधा तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविणे, आर्थिक व्यवहार सहज आणि सोपे बनविणे, तसेच डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित बनविणे हे मुद्दे ओळखून त्यावरील उपाययोजना सादर कराव्या लागणार आहेत.
विजेत्यांची निवड अशी होणार
हार्बिंझर २०२१ मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच आपले नावीन्यपूर्ण उपाययोजना दाखविण्याची संधीही मिळणार आहे. एक ज्युरी प्रत्येक गटातील विजेत्याची निवड करणार आहे. पहिला क्रमांक मिळविणार्या स्पर्धकाला ४० लाख, दुसर्या स्पर्धकाला २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
डिजिटल व्यवहार वाढले
कोविड महामारीच्या काळात अनिश्चितता असल्याने भारतातच नव्हे तर जगभरात नोटांची म्हणजेच रोख रकमेची मागणी वाढली आहे. नोटबंदीनंतर डिजिटल भरणा प्रणालीच्या विकासामुळे रोख रकमेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. प्लॅस्टिक कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यासह विविध पद्धतीने डिजिटल व्यवहार करण्याची आकडेवारी वाढली आहे, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
१०० अब्ज डॉलरहून अधिक व्यवहार
ऑक्टोबर २०२१ मध्ये डिजिटल व्यवहार ७.७१ लाख कोटी रुपये किंवा १०० अब्ज डॉलरहून अधिक होता. ऑक्टोबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून एकूण ४२१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. अमेरिकेत २०२० अखेरपर्यंत २.०७ ट्रिलिययन डॉलर इतका व्यवहार झाला होता. एका वर्षच्या तुलनेत हा १६ टक्के अधिक आहे. १९४५ नंतर एका वर्षातील ही सर्वाधिक टक्केवारी आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.