मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी क्षेत्रातील प्रमुख असलेल्या एचडीएफसी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दिलासा मिळाला आहे. आरबीआयने बँकेच्या डिजिटल लाँचवरील बंदी उठवली आहे. तथापि, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बँकेवर अंशतः लावण्यात आलेली बंदी हटविण्यात आली होती. आता या निर्णयानंतर नवा व्यावसायिक योजना पूर्ण करण्याचा बँकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
२०२० मध्ये आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या डाटा सेंटरमध्ये पुन्हा पुन्हा समस्या उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले होते. यामध्ये नवे क्रेडिटकार्डधारक जोडण्यावरही बंदी घालण्याचा समावेश होता. तसेच बँकेतील त्रुटींचा तपास करून उत्तरदायीत्व निश्चित करण्याचे निर्देशही आरबीआयने बँकेच्या संचालक मंडळाला दिले होते.
एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँक आरबीआयच्या शिफारशींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही या वेळेचा सदुपयोग आमच्या ग्राहकांच्या उदयोन्मुख डिजिटल गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने लघु, मध्यम आणि दीर्घकालीन योजना तयार करण्यासाठी केला आहे. आगामी काळात त्या लवकरच कार्यान्वित होतील. आम्ही ग्राहकांना सर्वश्रेष्ठ सेवा उपलब्ध करून देणार आहोत याचा आम्हाला आनंद आहे. दरम्यान, गेल्या शुक्रवारी बँकेचा शेअरचा भाव ०.३५ टक्के वाढून १३९७ रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ७,७४,४६३.१८ कोटी रुपये आहे.