मुंबई – सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील कोणतीही बँक असो, ग्राहकांचे हित पर्यायाने, देशाचा आर्थिक विकास हेच त्यांचे उद्दिष्ट असावे, असा नियम तथा धोरण आहे. मात्र काही बँका या नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रिझर्व बँकेला कारवाई करावी लागते. अशाच प्रकारे ग्राहकांचे हित लक्षात घेण्यास टाळाटाळ केल्याने महाराष्ट्रातील एका सहकारी क्षेत्रातील मोठ्या बँकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामुळे सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये खळबळ उडाली असून आणखी एका वित्तीय पुरवठादारावर आणि दोन खासगी कंपन्यांना दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे ग्राहक त्यांच्या सर्व खात्यांमधून केवळ 10 हजार रुपयेच काढू शकतील. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने बँकेच्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रस्थित मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीवर मध्यवर्ती बँकेने पैसे काढण्याच्या मर्यादेसह अनेक निर्बंध लादले आहेत. तसेच आता मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्यवर्ती बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्जाचे नूतनीकरण करणार नाही किंवा कोणतीही गुंतवणूक किंवा पेमेंट करणार नाही.
या सहकारी बँकेवर लादलेले हे निर्बंध येत्या सहा महिन्यांसाठी लागू झाले आहेत. मात्र, हे निर्बंध लादले म्हणजे मलकापूर सहकारी बँकेला बँकिंग कामकाजापासून रोखले गेले, असे नाही, असेही स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, ही सहकारी बँक आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत काही निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.
नियमांचे पालन न केल्याबद्दल टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि अपनित टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ATPL) ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दंड ठोठावला आहे. TCPSL ला सुमारे 2 कोटी रुपये आणि ATPL ला सुमारे 55 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या व्यवहारांच्या वैधतेशी काहीही संबंध नाही, असे RBI ने म्हटले आहे.
आणखी एका निवेदनात, आरबीआयने केरळस्थित कंपनी मुलामुत्तिल फायनान्सियर्स लिमिटेडला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. अनुत्पादित मालमत्तेचे वर्गीकरण करण्यासाठी नियमांचे पालन न केल्याबद्दल तो दोषी आढळला आहे.









