मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलिकडच्या वर्षांत डिजिटल फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी, कार्डवर असलेला सीवीवी कोड आदी गोपनीय बँकिंग माहिती शेअर करू नका, असं आरबीआयने म्हणलं आहे. तसेच लोकांनी फसवणुकीला बळी पडू नये यासाठी सायबर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही केले आहे. ‘बीवेअर-ए बुकलेट ऑन मोडस ऑपरेंडी ऑफ फायनान्शिअल फ्रॉड’ या नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत, आरबीआयने म्हटले आहे की लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. या पुस्तिकेत फसवणूक करणार्यांची कार्यपद्धती, फसव्या व्यवहारांपासून सावधगिरी आणि डिजिटल साक्षरता याबाबत माहिती देण्यात आली आहे.
फसवणुकीच्या तक्रारींचे विश्लेषण करताना आरबीआयने म्हटले आहे की माहिती किंवा फसवणूक करून ग्राहकांनी दिलेली गोपनीय माहिती हे आर्थिक फसवणुकीचे प्रमुख कारण आहे. यात लोकांना युजरनेम, पासवर्ड, कार्ड डिटेल्स, सीव्हीव्ही आणि ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका, मग ते कुटुंब असो किंवा मित्र असो. बँक अधिकारी, वित्तीय संस्था, आरबीआय आणि इतर अधिकृत संस्था कधीही ग्राहकांकडून गोपनीय माहिती विचारत नाहीत. त्यामुळे लोकांनीही कोणी ही माहिती विचारल्यास ती देऊ नये. तसेच कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या लिंक्स ओपन करु नये. असे संशयास्पद ईमेलही लगेचच डिलीट करावे, असे आरबीआयने सांगितले आहे.