मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चांगलाच दणका दिला आहे. नो युवर कस्टमर (KYC) आणि इतर सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रला तब्बल १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रला जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे, केवायसीशी संबंधित तरतुदी आणि बँकांद्वारे वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमधील कोडचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड करण्यात आला आहे. बँकेचे वैधानिक निरीक्षण आणि देखरेख मूल्यांकन (ISE) हे 31 मार्च 2020 रोजीच्या आर्थिक स्थितीनुसार केले गेले आहे. याशिवाय सरकारच्या खात्यात सीमा शुल्क जमा न केल्याचीही बँकेकडून चौकशी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ला स्टेट फोरम ऑफ बँकर्स क्लब केरळ (SFBCK) कडून सार्वजनिक क्षेत्रातील श्रेणी अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे.