नवी दिल्ली – जगातील सर्वात प्रभावी लशीच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या फायझरला मोठा धक्का बसला आहे. कारण फायझर बायोटेकच्या कोरोना लशीची प्रभाव क्षमता सहा महिन्यांनी कमी झाली आहे. फायझरचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, यापुर्वी संसर्ग रोखण्यासाठी ८८ टक्के प्रभावी असलेली लस सहा महिन्यांनंतर ४७ टक्क्यांवर आली आहे. याचाच अर्थ जगातील सर्वात प्रभावी असलेल्या या लशीचा प्रभाव केवळ सहा महिन्यांत ४१ टक्क्यांनी कमी झाला आहे, असे एका संशोधनानुसार सिद्ध झाले आहे.
सदर संशोधन लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून संशोधनाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लशीची प्रभाव क्षमता सहा महिन्यांपर्यंत ९० टक्क्याच्या उच्च पातळीवर राहिली.
संशोधकांनी सांगितले की, सदर डेटा सूचित करतो की, ही घट अधिक संसर्गजन्य प्रकारांऐवजी कमी कार्यक्षमतेमुळे झाली आहे. फाइझर आणि कैसर पर्मानेंटे यांनी गेल्या ८ महिन्यात कैसर पर्मान्टेन दक्षिण कॅलिफोर्नियामधील जवळपास ३.४ दशलक्ष लोकांच्या आरोग्य नोंदी तपासल्या होत्या.
या अभ्यासाबद्दल, फाइजर लशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ उपाध्यक्ष लुईस जोडर म्हणाले की, फायझर लस कोरोनाच्या डेल्टासह सर्व चिंताजनक प्रकारांवर प्रभावी आहे. परंतु इतर प्रकारांच्या तुलनेत परिणामकारकता ९७ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांवर आली आहे.
वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर अमेरिकन आरोग्य संस्था कोरोना लशीच्या बूस्टर डोसवर निर्णय घेणार आहेत. तथापि, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने प्रौढ आणि उच्च जोखमीच्या अमेरिकन लोकांसाठी फायझर व बायोएन्टेक लसीचा बूस्टर डोस वापरण्यास मान्यता दिली आहे.