मुंबई – एका महिलेला सारखी कोरोनाची लागण होत होती. दोन-चार वेळा नव्हे, तर ती महिला सलग आठ महिन्यांपर्यंत कोरोनाबाधित आढळली. या महिलेच्या शरीरात कोरोना विषाणू ३० वेळा उत्परिवर्तीत (म्युटेंट) झाला. त्यानंतर तीच महिला ओमिक्रॉन या नव्या अवतारामुळे बाधित झाली. ही महिला आधीपासूनच एचआयव्ही (एड्स) रुग्ण होती. दक्षिण अफ्रिकेत असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. याच प्रकरणांच्या आधारावरून दक्षिण अफ्रिकेचे संशोधक एचआयव्ही आणि ओमिक्रॉनच्या संबंधांचा दावा करत आहेत.
बीबीसीच्या वृत्तानुसार, एचआयव्हीमधून ओमिक्रॉनचा जन्म होण्याच्या सिद्धांतामागे काही ठोस कारणे आहेत. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण भलेही नोव्हेंबर २०२१ मध्ये दक्षिण अफ्रिकेत आढळला असेल. परंतु त्याचा खूप आधीच जन्म झाला होता, असा दावा संशोधकांनी केला आहे. हा व्हेरिएंट दुसर्या देशातून आला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु आतापर्यंत दक्षिण अफ्रिकी संशोधकांनीच याच्या जिनोमला सर्वप्रथम शोधून काढले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनची उत्पत्ती याच देशात झाल्याचे मानले जात आहे.
ओमिक्रॉनबद्दल सर्वात प्रथम शोध घेणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे प्रा. तुलिओ दी ओलिवेरिया म्हणाले, अशा प्रकारची अनेक प्रकरणे जगातील इतर देशातही आढळले आहेत. त्यांची संख्या १० ते १५ टक्के आहे. संशोधकांनी ओमिक्रॉन आणि एचआयव्हीसंदर्भात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे. ती ही की ओमिक्रॉन व्हेरिएंटची उत्पत्ती एचआयव्ही रुग्णाच्या शरीरात झाली असेल. कारण एचआयव्ही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत असते. अशा रुग्णांच्या शरीरात कोरोना विषाणू दीर्घकाळ राहू शकतो. कोरोना विषाणू जितक्या जास्त दिवस एखाद्याच्या शरीरात राहतो, तर त्याच्या म्युटेंटची शक्यताही तितकीच वाढते.
प्रा. तुलियो दी ओलिवेरिया म्हणाले, ही गोष्ट खूपच अशक्य वाटू शकते, परंतु जगातील अशा रुग्णांमध्ये ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी आहे. तो नव्या व्हेरिएंटला जन्म देण्याचा सर्वात मोठे स्रोत असू शकतो. कोविडशी सामना करण्यासाठी दक्षिण अफ्रिकी सरकारकडून तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आणि एचआयव्ही तज्ज्ञ डॉ. सलीम करीम म्हणाले, की कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले रुग्ण कोरोनाचा नवा व्हेरिएंटला जन्म देणारा सर्वात मोठा स्त्रोत असू शकतो. परंतु हे अद्याप सिद्ध झालेले नाही. आम्ही वेगवेगळ्या खंडातील पाच वेगवेगळे व्हेरिएंट पाहिले आहेत. परंतु ओमिक्रॉनचा जन्म अफ्रिकेत झाल्यावरून जगातील नागरिक आमच्यावर आगपाखड करत आहेत, ही गोष्ट योग्य नाही.
दक्षिण अफ्रिकेत जवळपास ८० लाख नागरिक एचआयव्हीबाधित आहेत. या ८० लाखांपैकी अँटीरेट्रोव्हायरल थेरेपी न मिळालेल्या रुग्णांची संख्या ३० टक्के आहे. ही थेरेपी एचआयव्ही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणू दुप्पटीने वाढतो. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पुनरुत्पादनाची शक्यता वाढते.
ओमिक्रॉन असो किंवा डेल्टा, अल्फा, बिटा, ग्याना या व्हेरिएंटचा जन्म अशा पद्धतीने झाला आहे. एकूणच आता माणसाचे शरीर कोरोना विषाणूची प्रयोगशाळा झाली आहे. त्यातून अनेक कोरोना विषाणूचे व्हेरिएंट निर्माण झाले आहेत. कोरोनाचे नवे नवे व्हेरिएंट कुठे आणि कसे जन्माला येत आहेत, याबद्दल तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत आहेत. परंतु सार्स-कोव्ह-२ चे मूळ कोठून आले? चीनची वुहान प्रयोगशाळा किंवा वटवाघूळ किंवा आणखी कोठून हे सुद्धा एक कोडे आहेच.