ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – असे म्हणतात की, मनुष्य हा सगळ्यात जास्त भित्रा प्राणी आहे, कारण तो साध्या डासांनाही घाबरतो, परंतु या मागचे सत्य कारण म्हणजे डासांपासून होणारे विविध प्रकारचे आजार होय. त्यामुळे डासांपासून लांब कसे राहावे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. त्यासाठी क्रीम लोकेशन पासून ते डासांच्या अगरबत्ती पर्यंत सगळ्या प्रकारचे उपाय करण्यात येतात. परंतु नेमके काही व्यक्तींना डास चावतात, तर काही व्यक्तींना ते चावत नाहीत. याचे कारण काय हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी अभ्यास केला असता एका संशोधनात असे आढळून आले आहे की, डास विशिष्ट रंगांकडे आकर्षित होऊन अधिक आकर्षक बनतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या रंगांची काळजी घेतली तर डासांच्या प्रादुर्भावापासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, डासांच्या सामान्य प्रजाती लाल, केशरी, काळा आणि आकाशी रंगांकडे अधिक आकर्षित होतात, तर हिरवा, जांभळा, गडद निळा आणि पांढरा याकडे दुर्लक्ष करतात. तसेच संशोधकांनी सांगितले की, या निष्कर्षांमुळे डासांना योग्य माणसे कसे सापडतात हे स्पष्ट करण्यात मदत झाली. कारण मानवी त्वचा मात्र रंगाची पर्वा न करता त्यांच्या डोळ्यांना लाल-केशरी सिग्नल पाठवते. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्राध्यापक जेफ्री रिफेल म्हणाले की, डास त्यांच्या आजूबाजूला काय आहे हे जाणून घेण्यासाठी वासाचा वापर करतात. त्यामुळे घरात किंवा आजूबाजूला डासांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर काळजी घ्यावी.
डासांना आपल्या श्वासातून कार्बन डाय ऑक्साईड सारख्या संयुगेचा वास येतो, तेव्हा तो वास त्यांच्या डोळ्यांना विशिष्ट रंग आणि इतर दृश्य नमुने स्कॅन करण्यासाठी उत्तेजित करतो. त्यामुळे ते आक्रमण करण्यासाठी संभाव्य व्यक्तींशी जोडले जातात. त्याचप्रमाणे श्वास, घाम आणि त्वचेचे तापमान हे तीन मुख्य संकेत डासांना आकर्षित करतात. अभ्यासादरम्यान, चौथा सिग्नल लाल रंगाच्या स्वरूपात आढळून आला, तो केवळ कपड्यांमध्येच नाही तर मनुष्याच्या त्वचेत देखील असतो.