नवी दिल्ली – देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने कोरोनाची तिसरी लाट येणार का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. कोविड-१९ तज्ज्ञ या प्रश्नाचे उत्तर आपापल्या पद्धतीने देत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात काही दिवसांच्या आतच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात भारताला कोरोना विषाणूच्या तिसर्या लाटेशी सामना करावा लागू शकतो, असा अंदाज केंब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रा. पॉल कट्टुमन यांनी लावला आहे.
महत्त्वाचे म्हणजे भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज यावर्षी मे महिन्यात केंब्रिजनने एका अभ्यासात वर्तवला होता आणि तो खरा ठरला होता. १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात ओमिक्रॉनच्या प्रवेशानंतर रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
संसर्गाचा वाढता दर
प्रा. कट्टुमन यांच्या माहितीनुसार, काही दिवसातच शक्यतो या आठवड्याच्या आतच कोरोना रुग्णांचा संसर्गाचा दर वाढणार आहे. संसर्गाचा दर किती वेगात वाढेल याबद्दल अंदाज लावणे अवघड आहे, असेही त्यांनी सांगितले.
सहा राज्यात जास्त परिणाम
प्रा. कट्टुमन आणि त्यांच्या संशोधन पथक जगभरातील देशात कोविड ट्रॅकरचा अभ्यास करते. पथकाने भारतातील सहा राज्यांना महत्त्वपूर्ण चिंता म्हणून संबोधले आहे. या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वृद्धी दर ५ टक्क्यांहून अधिक होता. ट्रॅकरनुसार ही गंभीर स्थिती भारतातील अकरा राज्यांमध्ये पोहोचली आहे.
फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट शक्य
केंब्रिज युनिव्हर्सिटीचे प्रा. पॉल कट्टुमन म्हणाले, की भारतातील अकरा राज्यांमध्ये कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचे कारण आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे विक्रमी रुग्ण नोंदवले जाऊ शकतात. तीच कोरोनाची तिसरी लाट असू शकते. दरम्यान देशात बुधवारी ९ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून, सध्या ७७ हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.