अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनाच्या दूरगामी परिणामांचा सामना काही रुग्णांना करावा लागत आहे. एकूण दोनशे प्रकारचे दुष्परिणाम एका संशोधन अहवालातून समोर आले आहेत. यामध्ये त्वचा, सांधे, हाडे, पोट, फुफ्फुसापासून हृदयापासून मेंदूपर्यंत दीर्घकालीन समस्या निर्माण झाल्या आहेत. यापुढील काळात या आरोग्य समस्या प्रकर्षाने दिसणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एम्सच्या सेंटर फॉर कार्डिओव्हस्कुलर, थोरॅसिक आणि न्यूरोसायन्सचे प्रमुख डॉ एम. व्ही. पद्मा म्हणाल्या की, यूकेमध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित सुमारे दोनशे विविध प्रकारची लक्षणे दिसून आली आहेत. पूर्वी कोरोनाचा फक्त फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे रुग्णांमध्ये दिसून आले. त्यामुळे मेंदूपासून पायांच्या नसापर्यंतच्या शिरांमध्ये रक्तप्रवाहास अडथळे येतात. त्यामुळे स्ट्रोकची प्रकरणे वाढतात. मज्जातंतूंमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे, हात-पायदुखीचा त्रास, डोकेदुखीचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. डॉ पद्मा यांनी सांगितले की, पाठीच्या कण्यामध्येही समस्या दिसून आल्या असून, त्यामुळे पक्षाघाताचा त्रास वाढत आहे.
फुफ्फुसांची श्वास आत रोखून ठेवण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि झोपेचा त्रास होत आहे. याशिवाय हृदयावरही त्याचा परिणाम दिसून येत असून यामध्ये हृदयाचे अनियमित ठोके, जलद हृदयाचे ठोके, हृदयविकाराचा झटका, छातीत जडपणा, खांद्यामध्ये दुखणे यासह हृदयात पाणी भरणे यासारख्या समस्याही दिसून येत आहेत. अनेकांची त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने, संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मानसिक आरोग्यावर तर सर्वाधिक परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. अस्वस्थता, निर्णयक्षमता आणि काम करण्याची क्षमता या सर्वांवर परिणाम झाला आहे. काहींना झोप येत नाही, तर काहींना फक्त झोप लागते. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, या लक्षणांमुळे घाबरण्याची गरज नाही. पण ते हलकेही घेता येणार नाही. त्यांनी लोकांना स्वतःहून औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा, असा सल्ला दिला आहे. यासोबतच सहा ते नऊ महिने त्रास होऊ शकतो, असेही सांगण्यात आले.