इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनुष्याचे जीवन हे जणू काही आजारांनी भरलेले आहे, असे म्हटले जाते. कारण आधुनिक काळात वेगवेगळ्या आजार वाढत आहेत, परंतु जुने आजार देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. विशेषतः मधुमेह, कर्करोग व हृदयविकार यांनी सर्व जगाला जणू काही व्यापून काढले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देश चिंताक्रांत बनले असून वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू आहे. त्यातच आता एक दिलासादायक बातमी म्हणजे कर्करोग आणि हृदयरोग यांच्यावर एक लस शोधण्यात आली असून यामुळे या भयानक आजारावर मात करता येणे शक्य होणार आहे.
कॅन्सर आणि हार्टअटॅक म्हणजेच कर्करोग आणि हृदयविकार हे दोन महत्त्वाचे आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहेत. अनेक वर्षांपासून यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनातूनच एक शुभ वार्ता आली आहे. कर्करोग तसेत हृदयविकार होऊ नये, यासाठी लवकरच बाजारात लस येणार आहे, असा दावा अमेरिकी तज्ज्ञांनी केला आहे.
अमेरिकेतील एका प्रमुख फार्मास्युटिकल फर्मने म्हणजेच औषध कंपनीने सांगितले की, येत्या पाच ते सात वर्षात म्हणजेच २०३० पर्यंत ही लस अनेक देशांमध्ये उपलब्ध होऊ शकते. गेल्या दोन अडीच वर्षात कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रचंड गुंतवणुकीमुळे संशोधनाचा वेगही जोमात आहे. पण गुंतवणुकीचा प्रवाह असाच सुरु राहिला तरच संशोधनात प्रगती होईल, अन्यथा यासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी चिंताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
मॉडर्ना या औषध कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल बर्टन यांनी सांगितले की, ‘सर्व प्रकारच्या आजारांसाठी’ अशा प्रकराची उपचार पद्धती आम्ही लवकरच आणणार आहोत, विशेष म्हणजे कोरोना विषाणूवरही याच मॉडर्ना कंपनीने लस तयार केली होती. आता विविध प्रकारचे ट्यूमर तयार करणाऱ्या कँसरवरही लवकरच लस तयार होत आहे.
जगभरातील रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्यूमर आढळतात, त्यांच्याविरोधात ही लस प्रभावी काम करेल, असा विश्वास पॉल बर्टन यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे आरएसव्ही अर्थात रेस्पिरेटरी सिन्सिटिय व्हायरस (RSV) विरोधातदेखील ही लस प्रभावीपणे काम करेल. तसेच सध्या ज्या आजारांवर काही उपचार होत नाहीत, अशा दुर्धर आजारांसाठीदेखील ही लस प्रभावी ठरेल, असे सांगण्यात येते.
Research Cancer Heart Attack Vaccination Big Relief