नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात महारष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाने उपस्थितांना आकर्षित केले. राज्याच्या चित्ररथास व्दितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधारित होती. या संकल्पनेवर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ असा मोहक चित्ररथ कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी साकारण्यात आला. या चित्ररथाला व्दितीय क्रमांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्तिपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंलनात सर्वांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्तिमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्यामाध्यातून दर्शविल्या गेले. यामध्ये लोककलाकार हे देवीचे भक्तीगीत गात नृत्यकरून “साडेतीन शक्तिपीठे दाखविती आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” अशी अर्चना करीत होते.
चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरविले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील होते.
Republic Day Maharashtra Tableau 2nd Award