मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. कलाविश्वातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. देसाई हे ५८ वर्षांचे होते. देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. देसाई यांच्या निधनाचं कारण अद्याप पुढे आले नाही.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो या भव्य सिनेमांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.
वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला. जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो, बिग बॉस यासारखे शो देखील होस्ट केले. याच स्टुडिओमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
renowned art director nitin desai commits suicide karjat studio
bollywood entertainment movie film