नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गासह त्याच्यावरील औषधे आणि लशीचा पुरेसा पुरवठा चर्चेचा मुद्दा झाला आहे. त्यावर पुढील १५ दिवसात कोरोना प्रतिबंधासाठी रेडमेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. अनेक राज्यांमध्ये रेडमेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.
मांडविया यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. केंद्र सरकार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यासह ते कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे १,५०,००० कुपींचे उत्पादन केले जात आहे. येत्या पंधरा दिवसात उत्पादन ३००,००० कुपींचे उत्पादन केले जाणार आहे, असे ते म्हणाले. सध्या २० प्लँटमध्ये रेमडेसिव्हिरचे उत्पादन होत असून, अधिक प्लँटना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे उत्पादन अधिक वेगाने होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
देशात कोविड रुग्णांचे दररोज नवे विक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांची उपलब्धतेचा त्यांनी आढावा घेतला. तसेच लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व क्षमतांचा उपयोग करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले.
पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, या बैठकीत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीकरणाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. तपासणी, संपर्क आणि उपचार या त्रिसूत्रीवर भर देऊन याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. स्थानिक प्रशासनाने लोकांच्या चिंतेबाबत विचार करून संवेदनशीलतेने काम करावे, तसेच पुढाकार घेऊन सक्रिय राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
देश में #Remdesivir का उत्पादन डबल यानी की 3 लाख वाइल प्रतिदिन की क्षमता से जल्द ही शुरू किया जाएगा । pic.twitter.com/9Lqnxttne6
— Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार) (@mansukhmandviya) April 18, 2021