रायगड – कोरोनाच्या दुसर्या लाटेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. देशातील अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे. तुटवड्यामुळे काळाबाजारही जोरात सुरू आहे. परंतु कोरोना रुग्णांसाठी हे औषण रामबाण औषध नाही, असे अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केल्यानंतरही त्याचा वापर कमी झालेला नाही. आता रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे रायगडमधील रुग्णांवर दुष्परिणाम होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर इंजेक्शनच्या ५०० कुप्या पुरविण्यात आल्या होत्या. साधारण १२० कोरोनारुग्णांवर रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. त्यापैकी ९० रुग्णांना इंजेक्शनचे दुष्परिणाम जाणवले. रेमडेसिव्हिर दिल्यानंतर रुग्णांना थंडी, ताप अशी लक्षणे दिसून आली आहेत. अनेक रुग्णांना हा त्रास जाणवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिव्हिरचा वापर थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिव्हिर प्रभावी औषध ठरत होते. मात्र या घटनांमुळे त्याच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनमुळे कोरोना रुग्णांना त्याचा फायदा होईलच असे नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे. तरीही त्याचा वापर वाढून काळाबाजार जोरात सुरू आहे.