मुंबई – राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यानंतरही राजकीय पक्षांना त्याचे भान राहिलेले दिसत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. रेमडेसिव्हिर देण्याबाबत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांचे आरोप फेटाळले. त्यानंतर रेमडेसिव्हिर नाट्याचा दुसरा भाग शनिवारी (१७ एप्रिल) घडला. रेमडेसिव्हिरची साठेबाजी करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. त्यानुसार ही लढाई थेट पोलिस ठाण्यात गेल्याचे पाहायला मिळाली.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना रात्री ताब्यात घेऊन पार्ले येथील पोलिस ठाण्यात आणले. त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी पार्ले पोलिस ठाणे गाठले. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पोलिसांमध्ये यावरून वादही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा वाद बीकेसीतील पोलिस उपायुक्त कार्यालयात पोहोचला. पोलिस कार्यालयात जवळपास एक तास देवेंद्र फडणवीस यांनी ठिय्या दिला. पोलिस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी ब्रक फार्माचे संचालक राजेश डोकानिया यांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता, यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून कंपनीच्या लोकांना धमकावल्याचा आरोप फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान, ब्रक फार्मा कंपनीच्या संचालकांकडे ६० हजार रेमडेसिव्हिरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी चौकशीदरम्यान कायदेशीर कागदपत्रे दाखवल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काय आहे प्रकरण
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीला भेट दिली होती. प्रदेश भाजपला ५० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची तयारी कंपनीने दर्शवली होती. ही इंजेक्शने देण्याची तयारी राज्य सरकारला देण्याचे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1383512479767023617