नाशिक – शहरातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश झाला आहे. एक इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या रविंद्र श्रीधर मुळक नावाच्या डॉक्टरला याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योगेश मोहिते (रा. अशोका मार्ग) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, डॉक्टरच जाळ्यात सापडल्याने नाशकात खळबळ उडाली आहे.
पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिते यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन हवे होते. त्यांचे एक नातेवाईक कॉलेजरोड तर दुसरे देवळाली कॅम्प येथे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी इंजेक्शनसाठी प्रयत्न सुरू केले. त्याचदरम्यान एका डॉक्टरने मोहिते यांना रविवारी रात्रीच्या सुमारास अमृतधाम येथे पेट्रोल पंपाजवळ इंजेक्शन घेण्यासाठी बोलावले. एक इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विक्री करण्याचे त्यांचे फोनवरुनच ठरले होते. पैसे देऊन इंजेक्शन घेण्याचा व्यवहार प्रत्यक्ष पार पडणार होता.
घटनास्थळी डॉक्टर आणि संबंधित व्यक्ती भेटले. मात्र, इंजेक्शनसाठी केवळ २० हजार रुपयेच असल्याने मोहिते हे जवळच्याच एटीएम केंद्रात पाच हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्याचवेळी मोहिते यांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधला आणि तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेत पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तरी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या हेतूने पथकाने संबंधितांची चौकशी केली. त्यात हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. मुळक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
डॉ. मुळकची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याचे पंचवटीतच खासगी क्लिनिक आहे. तो हे इंजेक्शन कुठून आणत होता, त्याला ते कसे मिळत होते, त्याने यापूर्वी किती जणांना, किती रुपयांना विकले आहे, यासह अनेक बाबी तपासात समोर येण्याची चिन्हे आहेत.