नाशिक – कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉ. रवींद्र श्रीधर मुळक याची होमिओपॅथी परिषदेकडे असलेली नोंदणी रद्द होणार आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे तसे पत्र दिले आहे. मुळक याने गुन्ह्याची कबुली दिली असून तो २५ हजार रुपयांना इंजेक्शनची विक्री करत होता.
योगेश मोहिते नावाच्या व्यक्तीला रेमडेसिव्हिर इंजेक्शन हवे होते. त्यांचे एक नातेवाईक कॉलेजरोड तर दुसरे देवळाली कॅम्प येथे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी इंजेक्शनसाठी प्रयत्न सुरू केले. त्याचदरम्यान एका डॉक्टरने मोहिते यांना रविवारी रात्रीच्या सुमारास अमृतधाम येथे पेट्रोल पंपाजवळ इंजेक्शन घेण्यासाठी बोलावले. एक इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विक्री करण्याचे त्यांचे फोनवरुनच ठरले होते. पैसे देऊन इंजेक्शन घेण्याचा व्यवहार प्रत्यक्ष पार पडणार होता.
घटनास्थळी डॉक्टर आणि संबंधित व्यक्ती भेटले. मात्र, इंजेक्शनसाठी केवळ २० हजार रुपयेच असल्याने मोहिते हे जवळच्याच एटीएम केंद्रात पाच हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्याचवेळी मोहिते यांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधला आणि तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेत पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तरी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या हेतूने पथकाने संबंधितांची चौकशी केली. त्यात हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. मुळक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आता मुळक याची होमिओपॅथी नोंदणी (सनद) रद्द होण्याची चिन्हे आहेत.