नवी दिल्ली ः देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर फक्त रुग्णालयातील गंभीर रुग्णांसाठीच करावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. या इंजेक्शनचा वापर घरगुती उपचार घेणा-या रुग्णांसाठी नसून, फक्त रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी करावा, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. मेडिकलमधून या इंजेक्शनच्या खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. इंजेक्शनचा वापर तर्कसंगत आणि अधिकृतरित्या व्हावा, असे ते म्हणाले.
गृहविलगीकरणातील रुग्णांनाही व्हावा पुरवठा
देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर गृहविलगीकरणात असलेल्या गरजू रुग्णांसाठीसुद्धा केला जावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली होती, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. रुग्णालय आणि क्लिनिकच्या सल्ल्यानंतर गृहविलगीकरणातील रुग्णांना हे इंजेक्शन पुरवले जावे असा सल्ला आयएमएने दिला होता. संसर्ग झालेले मोठी रुग्णसंख्या गृहविलगीकरणात आहे. पाश्चिमात्य देशात ही पद्धत प्रचलित आहे, असे आयएमएचे चेअरमन संजय पाटील यांनी सांगितले. अशी परवानगी मिळाल्यास रुग्णालयावरी मोठा ताण कमी होईल. सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल रुग्णांसाठीच इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे.
अँटी व्हायरल औषध
रेमडेसिवीर हे एक अँटी व्हायरल औषध आहे. त्याचा उपयोग कोविड झालेल्या रुग्णांसाठी केला जात आहे. खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. गंभीर कोरोनारुग्णांना या इंजेक्शनचे ४ ते ५ डोस दिले जात आहेत. ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तिथेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने यापूर्वीच सांगितले आहे. तसेच सरकारी रुग्णालयांशी जोडल्या गेलेल्या खासगी रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.