कानपूर (उत्तर प्रदेश) – धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष इफ्तिखारुद्दीन यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने एसआयटीच्या चौकशीचेही आदेश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आयएएस अधिकारीच या प्रकरणात असल्याचे पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आयएएस अधिकारी इफ्तिखारुद्दीन यांंचा धर्मांतरण टोळीशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. शासकीय निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत धर्मांतरणाबाबत भाषणे करण्यात आली. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
व्हिडिओमध्ये इफ्तिखारुद्दीन दुसऱ्या समाजाच्या नागरिकांना मूलतत्त्ववादाचे धडे देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ त्यांच्या निवासस्थानातील आहे. प्रकरण चांगलेच तापल्यानंतर पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी व्हिडिओची चौकशी अतिरिक्त पोलिस उपायुक्त पूर्वी सोमेंद्र मिणा यांच्याकडे सुपूर्द केली आहे. व्हिडिओमध्ये गुन्हेगारी कृत्य केले आहे किंवा नाही तसेच आयएएस अधिकार्याने नियमांचे उल्लंघन केले आहे किंवा नाही याबाबत चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मठ-मंदिर समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भूपेश अवस्थी यांनी दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. वरिष्ठ अधिकारी सनातन धर्माविरुद्ध प्रचार आणि प्रसार करत आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप अवस्थी यांनी केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या प्रकरणाच्या चौकशचे आदेश दिले.
कानपूर आणि उन्नाव दौर्यादरम्यान काही लोकांनी हे प्रकरण आपल्या निदर्शनास आणून दिले होते. हे गंभीर प्रकरण आहे. त्याची चौकशी केली जाईल. जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आयएएस अफ्तिखारुद्दीन प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले. एसआयटीचे अध्यक्ष मिणा तसेच एडीजी जोन भानू भास्कर हे सदस्य असतील. एसआयटीला सात दिवसात आपला अहवाल सादर करायचा आहे.