नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर आता पेड दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी भाविकांना आता १०० रुपये मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत याठिकाणी व्हीआयपी दर्शनाची सुविधा नव्हती. मात्र, भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थानने म्हटले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदूरीगड येथील सप्तशृंगी मंदिरात भाविकांसाठी सशुल्क व्हीआयपी दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकर दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी १०० रुपयांत दर्शनाची सुविधा मिळणार आहे. सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी वाढत असल्याने लवकर दर्शनासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सशुल्क पास घेणाऱ्या व्यक्तींसोबत असणाऱ्या १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना निःशुल्क पास मिळणार आहे. तसेच २० रुपयांत प्रसादालयात भोजनाची सुविधा आहे. तसा निर्णय सप्तशृंगी देवी मंदिर देवस्थानने घेतला आहे.
दरम्यान, मंदिराला मिळणारी दान-देणगी याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचा आरोप अखिल भारतीय संत समितीचे प्रदेशाध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी केला असून, राज्यातील महत्त्वाच्या मंदिर व्यवस्थापनाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. धर्म रक्षण, शास्त्र रक्षण आणि संस्कृती रक्षणासाठी भाविक देणगी आणि दान करत असतात. मात्र या देणगीचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचा दावा महंत अनिकेत शास्त्री यांनी केलाय. या देणगीसंदर्भात आधी निवेदन देऊन, नंतर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Religious Saptashrungi Temple Paid Darshan Start