लखनऊ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशमध्ये अनधिकृत धर्मांतर करणार्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर तपासातून रोज वेगवेगळी माहिती उघड होत आहे. या टोळीबद्दल एटीसच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. अहमदाबादमध्ये अटक करण्यात आलेला मोहम्मद उमर गौतमचा साथीदार सलाहुद्दीनगद्वारे एटीएस या टोळीसंदर्भात हवाला रॅकेटचा खुलासा करण्याची शक्यता आहे. सलाहुद्दीनला घेऊन एटीएसचे पथक लखनऊला पोहोचले आहे. त्याला न्यायालयासमोर सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपी इरफान शेख, अब्दुल मन्नान आणि राहुल भोला यांना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
एटीएसचे अनिल कुमार विश्वकर्मा यांच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना लखनऊच्या मुख्य न्यायदंडाधिकार्यांनी तीन संशयितांची पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. एटीएसने सात दिवसांची कोठडी मागितली होती. एटीएसला इरफान शेखकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मूकबधीर मुलांचे धर्मांतर करण्यासाठी इरफानने महत्त्वाची भूमिका निभावल्याची माहिती मिळाली आहे. अशा मुलांचे ब्रेनवॉश करण्यास तो कुख्यात आहे. सहाहुद्दीनकडून हवाला रॅकेटबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याने आधी हवालाच्या माध्यमातून मोहम्मद उमर गौतमला पैसेही पाठविले आहेत. या आधारावरून धर्मांतर करणार्या टोळीला हवालाद्वारे पैसे मिळत असल्याचा संशय एटीएसला आला आहे. सलाहुद्दीनकडून जप्त करण्यात आलेल्या आयपॅड आणि मोबाईल फोनचा फॉरेंसिक प्रयोगशाळेत तपास करण्यात येणार आहे.
परदेशातून फंडिंग आणि इतर संसशयित स्रोतांद्वारे पैसे मिळवून अनधिकृतरित्या धर्मांतर करणार्या टोळीमध्ये उमर गौतम आणि काझी जहांगीर आलमसुद्धा तीन जुलैपर्यंत एटीएसच्या कोठडीत आहे. एटीएसने दोघांनाही २० जूनला अटक केली होती. त्यानंतर त्यांची सात दिवसांची कोठडी मिळविली होती. त्यानंतर कोठडी वाढविण्यात आली. चौकशीदरम्यान उमर गौतमच्या पूर्ण नेटवर्कची माहिती मिळाली आहे. त्याच माहितीच्या आधारे संशयितांना अटक करण्यात आली आहे.