इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स फाउंडेशनने प्रतिष्ठित पोस्टग्रॅज्युएट स्कॉलरशिप २०२४-२५ च्या निकालांची घोषणा केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि लाइफ सायन्सेससारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १०० प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी, हा निकाल राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आला आहे, जो विज्ञान आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या फाउंडेशनच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, मेंटॉरशिप, इंडस्ट्री एक्स्पोजर आणि संशोधनाच्या संधी दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश भारतातील होतकरू वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधकांना प्रोत्साहन देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा उचलण्यास मदत करणे आहे.
यावर्षी, देशभरातील ४४ प्रमुख संस्थांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्व क्षमता आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानाची बांधिलकी हे प्रमुख निकष ठेवले गेले. कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लाइफ सायन्सेस, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, अक्षय ऊर्जा आणि नवीन ऊर्जा, केमिकल अभियांत्रिकी तसेच गणित आणि कम्प्युटिंग या आठ विषयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.
या प्रसंगी, रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आम्ही ज्ञान आणि नवोपक्रमाचा उत्सव साजरा करत आहोत. रिलायन्स फाउंडेशन अशा युवा प्रतिभांना प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे, जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचे भविष्य घडवतील. आमचे शिष्यवृत्तीधारक जिज्ञासा आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहेत, आणि त्यांचा प्रवास सशक्त करण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
रिलायन्स फाउंडेशनचा उद्देश पुढील १० वर्षांत ५० हजारहून अधिक अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा आहे. हा उपक्रम भारताच्या शिक्षण व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डिसेंबर २०२४ मध्ये, रिलायन्स फाउंडेशनने ५००० विद्यार्थ्यांना अंडरग्रॅज्युएट शिष्यवृत्ती प्रदान केली होती.
शिक्षण हे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. १९९६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या धीरूभाई अंबानी स्कॉलरशिप योजना आणि २०२० मध्ये सुरू झालेल्या रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप्स योजनेंतर्गत आजपर्यंत २८ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली गेली आहे. या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना नेतृत्व आणि व्यावसायिक प्रगतीसाठी नवी क्षितिजे खुली झाली आहेत.
रिलायन्स फाउंडेशन भारतातील तरुणांना शिक्षित आणि सशक्त करण्याच्या आपल्या ध्येयावर सातत्याने कार्यरत आहे, जेणेकरून ते देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा करू शकतील.
ज्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता, ते आपला निकाल खालील लिंकवर पाहू शकतात:
शिष्यवृत्ती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://scholarships.reliancefoundation.org/PGScholarship_ApplicationStatus.aspx