विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशात कोरोना विषाणूच्या चाचण्या वेगवान होण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने (आरआयएल) इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रॅथ ऑफ हेल्थकडून १.५ कोटी डॉलरमध्ये रॅपिड कोविड १९ आयडेंटिफिकेशन सोल्युशनची खरेदी केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी इस्रायली टीमला भारतात बोलावण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष परवानगी मागितली आहे. ही टीम भारतात येऊन रॅपिड कोविड १९ आयडेंटिफिकेशन सोल्युशनची स्थापना करणार आहे. यासाठी रिलायन्सकडून कर्मचार्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रिलायन्सला वेगवान चाचणी प्रणाली बसवायची आहे. त्यासाठी रिलायन्सच्या अर्जाला ब्रीथ ऑफ हेल्थच्या प्रतिनिधी मंडळाला इस्त्रायलकडून मान्यता मिळाली आहे. इस्त्रायली वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनीचे तज्ज्ञ रिलायन्सच्या टीमला भारतात ही प्रणाली चालवण्यास शिकवणार आहेत. कोरोना विषाणू कॅरिअर आणि रुग्णांना ओळखणारी ही प्रणाली देशात संक्रमणाची गती कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते. या माध्यमातून कोरोनच्या चाचणीचे निकाल काही सेकंदात मिळू शकतील.
रिलायन्सने जानेवारी २०२१ मध्ये ब्रीथ ऑफ हेल्थशी १.५ कोटी डॉलरला करार केला होता. या करारानुसार रिलायन्स इस्त्रायली स्टार्टअप कंपनीकडून कोरोना चाचणी किट खरेदी करणार आहे. याद्वारे दरमहा दहा लाख डॉलर खर्च करून कोट्यवधी लोकांची कोरोना चाचणी केली जाऊ शकणार आहे.