विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ब्रिटन येथील प्रतिष्ठीत कंट्री क्लब आणि लग्झरी गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क खरेदी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शेअर मार्केटला याची माहिती दिली. कंपनीने ५७ मिलीयन पाऊंडमध्ये म्हणजेच ५९२ भारतीय रुपयांमध्ये कंट्री क्लब आणि रिसोर्ट खरेदी केले आहे.
तसे पाहिले तर गेल्या चार वर्षांत रिलायन्सने एकूण ३.३ बिलीयन डॉलर किमतीच्या कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीने गेल्या चार वर्षांमध्ये ज्या कंपन्या खरेदी करण्याची घोषणा केली आहे त्यात १४ टक्के रिटेल सेक्टरच्या, ८० टक्के टेक्नॉलॉजी, मिडीया आणि टेलिकॉम सेक्टर आणि सहा टक्के एनर्जी सेक्टरच्या कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्स कंपनीने शेअर मार्केटला सांगितले की ब्रिटनच्या बकिंघमशायरमध्ये एक हॉटेल आणि गोल्फ कोर्सची मालकी असलेल्या कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे रिलायन्सच्या कन्झ्युमर आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ झाली आहे.
रिलायन्सने म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीयल इव्हेस्टमेंट अँड होल्डिंग्स लिमीटेडने ५७ मिलीयन डॉलरमध्ये ब्रिटनची कंपनी स्टोक पार्क लिमीटेडचे सर्व शेअर्स खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे जम्स बॉंडच्या गोल्डफिंगर (१९६४) आणि टुमारो नेव्हर डाईज (१९९७) या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण स्टोक पार्कमध्ये झाले होते.