मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठी तयारी केली आहे. अंबानी यांनी रिलायन्स जिओचे 5G आणण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यानंतर आता दोन मोठे आयपीओ आणण्याची तयारी रिलायन्सने केली आहे. यासंदर्भात अंबानींकडून अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचे आयपीओ आणण्याची तयारी रिलायन्स कंपनीने केली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) आयपीओ हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. तो येत्या ४ मे रोजी खुला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एलआयसीपेक्षा मोठा आयपीओ आणण्याची तयारी रिलायन्सकडून सुरू असल्याचे समजते. हिंदू बिझनेस लाईनच्या अहवालानुसार, रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून ५० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम उभारण्याचा विचार रिलायन्स उद्योग समुहाकडून सुरू आहे.