मुंबई – आधुनिक काळात प्रत्येकाकडेच मोबाईल आहे, परंतु या मोबाईलमध्ये असलेले वेगवेगळे ॲप्स वापरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः या ॲपच्या माध्यमातून आणि यातून सायबर क्राईम घडताना दिसून येतात. त्यामुळे यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेक राज्यात देखील असेच सायबर क्राईमचे प्रकार उघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशभरात ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. त्यातच या काळात प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करण्याऐवजी वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कोरोना संसर्गाचा धोका टाळला जात असला तरी ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूकचे म्हणजेच सायबर क्राईमचे प्रकार वाढले आहेत.
विशेष म्हणजे हे सायबर गुन्हेगार कोणालाही फसवू शकतात, या संदर्भात रिझर्व्ह बँकेसह अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी देशभरातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने अनेकांची आर्थिक फसवणूक करून ग्राहकांच्या बँक खात्यात पैसे लंपास करतात. आता रिलायन्स जिओकडून यूजर्ससाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून सायबर फसवणूकीबाबत अलर्ट दिला आहे.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओन या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांना दिलेल्या ई-मेल नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांची सुरक्षा त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. जिओमध्ये तुमची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात, आम्हाला सायबर फसवणुकीशी संबंधित काही प्रकरणे समोर आली आहेत, काही फसवणूक करणारे भामटे हे सध्या जिओचे प्रतिनिधी म्हणून आपले आधार, बँक खाती, ओटीपी आणि प्रलंबित eKYC संबंधित माहिती जाणून घेण्याच्या बहाण्याने ग्राहकाला फोन करतात. तसेच त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी फसवणूक करणारे अनेक डावपेच वापरतात, त्याला बळी पडू नका.रिलायन्स जिओने पुढे म्हटले आहे की, फसवणूक करणारे खोटा दावा करताना सांगतात, तुम्ही ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुमच्या जिओ सेवांवर परिणाम होईल. पण त्यांच्या कडे लक्ष देऊ नका, असेही जिओने म्हटले आहे.
रिलायन्स जिओने फसवणूक करणार्यांच्या कारनाम्याबद्दल सांगितले आहे की, ‘सामान्यत: ग्राहकांना तपशील शेअर करण्यासाठी कॉल बॅक नंबर दिला जातो. जेव्हा ग्राहक दिलेल्या नंबरवर कॉल करतो तेव्हा त्याला थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. या थर्ड पार्टी अॅपद्वारे, फसवणूक करणारे ग्राहकांना फोन आणि उपकरणांशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये प्रवेश देतात.
जिओने आणखी म्हटले आहे की, ग्राहकांनी रिमोट अॅक्सेस अॅप्स डाउनलोड करू नयेत, रिलायन्स जिओच्या मते, ते ग्राहकांना कधीही थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत नाही, कारण ग्राहकांसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती मायजिओ ( MyJio ) अॅपमध्ये असते. जिओने ग्राहकांना कोणत्याही संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंटवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नको असलेल्या कॉलला उत्तर देऊ नका. रिमोट ऍक्सेस अॅप्स डाउनलोड करू नका, कारण असे केल्याने तुमच्या फोनची सर्व माहिती फसवणूक करणाऱ्यांपर्यंत जाऊ शकते.