मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते. त्यातच जिओने वेगवेगळे प्लॅन आणल्याने या स्पर्धेत बाजी मारली होती, परंतु गेल्या काही दिवसात जिओची क्रेझ कमी होत असल्याचे म्हटले जाते. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 मध्ये Jio वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर याच दरम्यान बीएसएनएल आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना या काळात फायदा झाला आहे.
रिलायन्स जिओ कंपनीला सध्या मोठा झटका बसला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफर इंडिया (TRAI) च्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात 12 दशलक्ष मोबाईल प्लॅन वापरकर्ते रिलायन्स जिओपासून दूर झाले आहे. तर या काळात एअरटेलमध्ये 4.75 लाख नवीन वापरकर्ते जोडले गेले आहेत. तर व्होडाफोन -आयडीया (Vi) ने वापरकर्त्यांच्या संख्येत 16.14 लाखांची घट नोंदवली आहे. त्याच वेळी, भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या वापरकर्त्यांची संख्या 11 लाखांनी वाढली आहे. तसेच महागड्या रिचार्जमुळे 1.29 कोटी युजर्सने जिओ प्लॅन सोडल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे जिओची युजर्स संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे, एअरटेल आणि बीएसएनएलच्या वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्याच वेळी असा दावा केला जात आहे की Jio मधून निष्क्रिय सदस्य काढून टाकले आहेत. ज्यामुळे मोबाईल वापरकर्त्यांची संख्या कमी होत आहे.
VLR म्हणजे Visitors Location Register. ही सक्रिय सदस्यांची पातळी आहे, जी नेटवर्क प्रदात्याची महसूल निर्मिती क्षमता दर्शवते. व्हीएलआर चांगला असेल तर आगामी काळात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे. कंपन्याचे VLR प्रमाण असे – एअरटेल 98.01 टक्के, जिओ 87.64 टक्के, व्होडाफोन आयडिया 86.42 टक्के, बीएसएनएल 50.32 टक्के. ट्रायच्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये एकूण 8.54 दशलक्ष वापरकर्त्यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) चा पर्याय निवडला. या दरम्यान महाराष्ट्रातून सर्वाधिक MNP विनंत्या आल्या आहेत. यानंतर या यादीत राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांचा क्रमांक येतो.