पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईची झळ सगळ्याच बाजूंनी सहन करावी लागत असतानाच आता मोबाईलचे टॅरिफ प्लॅनदेखील महाग होत चालले आहेत. रिलायन्स जिओने त्यांचा एक प्लान १५० रुपयांनी महाग केला आहे. याबाबत अद्याप फारशी चर्चा झाली नसली तरी लवकरच लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जिओने टॅरिफ प्लॅन महाग केल्यामुळे आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासारख्या इतर कंपन्यादेखील त्यांचे प्लॅन महाग करतील, अशी भीती आहे.
मोबाईल वापर हा आजच्या काळाची गरज आहे. आयुष्य सुकर करण्यासाठी मोबाईल वापरण्यास प्रत्येकाचेच प्राधान्य असते. पण दिवसेंदिवस महागाई वाढत असून आता मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनीदेखील दरवाढ सुरु केली आहे. रिलायन्स जिओचा ७४९ रुपयांचा प्लॅन आता ८९९ रुपयांचा झाला आहे. हा प्लॅन फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठी आहे, म्हणजेच तुम्ही इतर कोणताही फोन वापरत असाल, तर जिओचा हा प्लान तुमच्यासाठी नाही. जिओ फोनच्या या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो. याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
दरवर्षी टेलिकॉम कंपन्या त्यांचे प्लान्स महाग करत आहेत, त्यामुळे लवकरच सर्व कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन पूर्वीसारखेच महागडे होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अहवालानुसार, जिओ, एअरटेल आणि वोडाफोनसारख्या खाजगी कंपन्या यावर्षी दिवाळीपर्यंत त्यांचे प्री-पेड प्लान १० टक्के ते १२ टक्के महाग करू शकतात. या वाढीनंतर, जर एखाद्या प्लॅनची किंमत १०० रुपये असेल तर त्याची किंमत ११० ते ११२ रुपये असू शकते. टेलकोंना महागड्या दर योजनेचा फायदा होईल आणि त्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) १० टक्के वाढेल. या वाढीनंतर, एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाचे ARPU अनुक्रमे २०० रुपये, १८५ रुपये आणि १३५ रुपये होईल.