मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हजारो रुपयांचे तिकीट खरेदी करून मैदानावर आयपीएल बघावे लागते आणि महिन्याकाठी पैसे भरून टीव्हीवर आयपीएल बघावे लागते. अश्यात मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा ‘फ्री कार्ड’ वापरत ग्राहकांना जीओ सिनेमावर फुकट आयपीएल बघण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र अंबानींची यापूर्वीची धोरणं लक्षात घेता हा आनंद किती दिवस किंवा किती वर्ष टिकणार, हे सांगता येणार नाही.
बीसीसीआयने आयपीएलच्या टेलिव्हिजनवरील प्रसारणाचे हक्क स्टार वाहिनीला दिले आहेत, तर डिजीटल हक्क व्हायाकॉम १८ ला दिले आहेत. व्हायाकॉम १८ आणि जिओने हे दोन्ही ब्रांड गेल्यावर्षी एकत्र आले आणि त्यांनी जिओ नावानेच सेवा सुरू केली. त्यामुळे जिओ सिनेमावर आयपीएल दाखविणे शक्य होत आहे. अर्थात गेल्यावर्षी आयपीएलचे डिजीटल प्रसारणाचे हक्क हॉटस्टारकडे होते. मात्र यंदा जिओ सिनेमावर आयपीएल दाखविले जात आहे.
विशेष म्हणजे इतर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जिओ सिनेमा बरेच मागे आहे. पण त्यावर आयपीएल फुकट बघायला मिळणार हे कळल्यावर पहिल्याच सामन्याला अडिच कोटी प्रेक्षकांनी जिओ सिनेमा हे अॅप डाऊनलोड केलं. त्यामुळे अंबानींना आपला जिओ सिनेमाचे ब्रांड लोकांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य होत आहे. अर्थात फुकट सेवा देण्यामागे ब्रांडिंगचेच धोरण आहे.
डिजीटल प्रसारणाचे हक्क मिळविण्यासाठी व्हायाकॉम १८ ने तब्बल २३ हजार ७५८ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा जाहिरातीतून काढण्याचा प्रयत्नही होणे स्वाभाविक आहे. पण सुरुवातीला एक पाऊल मागे घेणारे जाहिरातदार आता जिओ सिनेमावर जाहिरातींसाठी गर्दी करीत आहेत, असे चित्र आहे.
पहिले फुटबॉल वर्ल्ड कप
जिओने सुरुवातीला प्रेक्षकांना फुटबॉल वर्ल्ड कप फुकटात उपलब्ध करून दिला. पण त्यातून फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर डब्ल्यूपीएल अर्थात वर्ल्ड प्रिमीयर लिगही मोफत उपलब्ध करून दिले. पण त्यातही फारसा नफा कंपनीला मिळाला नाही. मात्र हाच फंडा आयपीएलसाठी वापरल्यामुळे कंपनीला फायदा होत आहे.
सवय लागेल, पण नंतर…
ग्राहकांना मोफत सीमकार्ड देणे, मोफत डेटा देणे याची सुरुवात जिओ कंपनीनेच केली. आणि एकदा सवय लागली की हळूहळू दर वाढवायचे, हे जिओचे धोरण आहे. त्यामुळे आज आयपीएल फुकटात दाखविण्याचे धोरण उद्या अस्तित्वात असेल की नाही, याची खात्री नाही. कदाचित उपांत्य सामन्यापासून किंवा पुढील वर्षीच्या आयपीएलपासून ग्राहकांना जिओ सिनेमा बघण्यासाठी पैसेही मोजावे लागू शकतात.
Reliance Jio IPL Live Telecast Free of Cost