अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये, पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. म्हणूनच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्याजागी आकाश अंबानी यांना बोर्डाचे अध्यक्ष बनवले आहे. २७ जून रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आकाशला बिगर कार्यकारी संचालक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत. त्यापैकी आकाश आणि ईशा जुळी भावंडे आहेत तर अनंत अंबानी सर्वात लहान आहेत. अंबानी आपला काही व्यवसाय मुलगी ईशाकडे सोपवण्याची शक्यता आहे. रिलायन्स समूह ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स, रिटेल व्यवसाय आणि डिजिटल सेवांमध्ये सक्रिय आहे किरकोळ आणि डिजिटल सेवा व्यवसायासाठी स्वतंत्र पूर्ण मालकीच्या कंपन्या तेल आणि रसायने आणि ऊर्जा व्यवसाय रिलायन्सअंतर्गत चालवला जातो.
नवीन पिढीत कोणता व्यवसाय कोणाकडे..
१. आकाश अंबानी :
जिओ प्लॅटफॉर्म, जिओ लिमिटेड सावन मिडिया, जिओ इन्फोकॉम, रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सच्या बोर्डावर असणार आहे. २०१९ मध्ये श्लोका मेहतासोबत लग्न केले.
२. ईशा अंबानी :
येल आणि स्टॅनफोर्ड येथे शिक्षण घेतले असून २०१५मध्ये कौटुंबिक व्यवसायात सामील झाली. जिओ प्लॅटफॉर्म्स, जिओ लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डावर आहे. डिसेंबर २०१८मध्ये ईशाने व्यापारी अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत लग्न केले.
३. अनंत अंबानी :
अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण घेतले. रिलायन्स न्यू एनर्जी, रिलायन्स न्यू सोलार एनर्जी, रिलायन्स ओटूसी, जिओ प्लॅटफॉर्मच्या बोर्डावर आहेत.
मागच्या वर्षी संकेत..
२८ डिसेंबर २०२१ रोजी धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश अंबानी म्हणाले होते, “तरुण पिढी आता नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यास तयार आहे. आता मला उत्तराधिकाराच्या प्रक्रियेला गती द्यायची आहे. नव्या पिढीला मार्गदर्शन करायला हवे. ते सक्षम केले पाहिजेत. त्यांना प्रोत्साहन देऊन बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. रिलायन्ससाठी मुलांची उत्कटता, वचनबद्धता आणि समर्पण मी दररोज पाहतो आणि अनुभवतो. माझ्या वडिलांनी लाखो लोकांचे जीवन बदलून भारताच्या विकासात योगदान दिले आहे. तीच उर्जा आणि क्षमता मला माझ्या मुलांमध्ये दिसते. या प्रचंड संधीचा फायदा घेण्याची आणि रिलायन्सच्या भविष्यातील वाढीचा पाया घालण्याची वेळ आली आहे.”
यांनाही स्थान
रामिंदर सिंग गुजराल आणि के. व्ही. चौधरी यांना अतिरिक्त संचालक बनवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दोघांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज मोहन पवार यांची रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Reliance Industry Group Ambani Family Next Generation Responsibility