मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिलायन्स फाउंडेशनने 2024-25 साठी 5,100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. देशभरातील ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश हवा आहे ते यासाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रमात प्रत्येक विषयात शिष्यवृत्ती दिली जात आहे. प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल.
जे विद्यार्थी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार आहेत ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. पदवी अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी कोणत्याही विषयात अर्ज करू शकतात. त्यांना गुणवत्ता आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाईल.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि जीवन विज्ञान विषयांमध्ये शिष्यवृत्ती दिली जात असून ती केवळ गुणवत्तेच्या आधारावर दिली जाईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
रिलायन्स फाऊंडेशन केवळ अभ्यासासाठी निधी देत नाही तर विद्यार्थ्यांना तज्ञांची मदत देखील प्रदान करते जेणेकरून ते त्यांच्या क्षमता समजून घेऊ शकतील आणि भविष्यातील ध्येये ठरवू शकतील.
रिलायन्सने आतापर्यंत 23000 हून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही रिलायन्स फाउंडेशनच्या www.scholarships.reliancefoundation.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2024 आहे.