इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंडमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय खेळांच्या 38व्या आवृत्तीत रिलायन्स फाउंडेशनशी संबंधित 50 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, जूडो, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि टेबल टेनिस या 8 खेळांमध्ये फाउंडेशनचे खेळाडू पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंडमध्ये होणाऱ्या या खेळांमध्ये अनेक राष्ट्रीय विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे.
रिलायन्स फाउंडेशनची खेळाडू व टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलीना बोरगोहेन पॅरिस ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत उदयोन्मुख जूडोपटू हिमांशी टोकस पदकांच्या शर्यतीत असतील. त्यांनी नुकतीच आफ्रिकन कपमध्ये शानदार विजय मिळवला असून त्या वर्ल्ड ज्युनियर रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचल्या आहेत.
ऍथलेटिक्स स्पर्धेत रिलायन्स फाउंडेशनचे अनेक राष्ट्रीय विक्रमधारक खेळाडू सहभागी होतील. ज्यामध्ये ज्योती याराजी (100 मीटर अडथळा शर्यत), तेजस शिरसे (110 मीटर अडथळा शर्यत), मणिकांता होबळिधर (100 मीटर), अमलान बोरगोहेन (200 मीटर) आणि रोजी मीना पॉलराज (पोल व्हॉल्ट) यांचा समावेश आहे. अनिमेष कुजूर (2024 मध्ये भारताचा सर्वात वेगवान धावपटू), डीएम जयराम, बापी हंसदा आणि साक्षी चव्हाण यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा उत्कृष्ट परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे.
ऍथलेटिक्स संघाबाबत बोलताना रिलायन्स फाउंडेशनचे ऍथलेटिक्स डायरेक्टर जेम्स हिलियर म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय खेळांसाठी खूप उत्सुक आहोत. हे आमच्या खेळाडूंसाठी त्यांच्या फिटनेसची चाचणी घेण्याची आणि त्यांनी केलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्याची संधी आहे. आम्हाला आशा आहे की आमचे खेळाडू अनेक पदके जिंकतील. हा आमच्यासाठी महत्त्वाचा वर्ष आहे, कारण आमच्यातील बहुतांश खेळाडू 2025 च्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी तयारी करत आहेत.”
बॅडमिंटनमध्ये अनुपमा उपाध्याय, उन्नती हुड्डा आणि श्रियांशी वलीशेट्टी या तिघी महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी दावेदारी करतील. टेबल टेनिसमध्ये दिग्गज जी साथियान पुरुष एकेरीत स्पर्धा करतील. शूटिंगमध्ये डबल आशियाई गेम्स पदक विजेती पलक गुलिया (10 मीटर एअर पिस्तूल) आणि विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन आशी चौकसे (10 मीटर एअर रायफल आणि 50 मीटर रायफल 3 पोजिशन) पदकांच्या शर्यतीत असतील.