विशेष प्रतिनिधी, मुंबई
हळूहळू घरातील प्रत्येक वापराच्या वस्तूंवर रिलायन्सचा अर्थात जिओचा ठप्पा दिसला तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नसेल. सध्या मोबाईल, वीज, टीव्ही, डीशटीव्ही यांच्या माध्यमातून तुमच्याआमच्या घरात पोहोचलेले रिलायन्सने जिओ ग्लासचीही घोषणा केली आहे. शिवाय ६० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक कररून बॅटरी स्टोरेज प्लान्ट उभारण्याची घोषणाही मुकेश अंबानी यांनी बुधवारी झालेल्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
रिलायन्स कंपनीची ही घोषणा इलेक्ट्रीक वाहन स्वस्तात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास उद्योगविश्वाने व्यक्त केला आहे. कारण सध्या इलेक्ट्रीक वाहन हा देशातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानला जात असून या सेगमेंटवर वाहन कंपन्या आणि सरकारची विशेष नजर आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, ‘मी २०३५ पर्यंत झिरो कार्बन इमिशनच्या १५ वर्षांच्या योजनेची घोषणा केली होती. आता ती लागू करण्यासाठी आपली रणनिती आणि रोडमॅप सादर करताना मला आनंद होत आहे. कंपनीने आणलेल्या तीन वर्षीय योजनेत ‘चार गिगा फॅक्ट्रीज’ तयार करण्याचाही समावेश आहे. पुढील तीन वर्षांमध्ये आपण ६० हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणुक करणार आहोत. २०३० पर्यंत रिलायन्स कमीत कमी १०० गिगावॉट सौर ऊर्जा निर्माण करेल. गावांमध्ये रुफटॉप सोलरच्या माध्यमातून त्याची सुरुवात होईल.’ रिलायन्सच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचे हिरो कंपनीने स्वागत केले आहे. जगभरात इलेक्ट्रीक वाहनांच्या उद्योगात भागिदारी करण्याचा विचारही त्यांनी मांडला आहे.
टेस्लाचे चार्जिंग स्टेशन चीनमध्ये
टेस्लाने आपले पहिले इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन चीनमध्ये लॉन्च केले आहे. हे स्टेशन सौर उर्जेच्या माध्यमातून वाहनांचे चार्जिंग करण्यात सक्षम आहे. त्यातच आज अंबानी यांनी देखील सौर उर्जेच्या माध्यमातून तयार होणारी उर्जा स्टोअर करण्यासाठी रिलायन्स एक कारखाना तयार करेल, अशी घोषणा केली आहे. विजेच्या सोबतच रिलायन्स हरित हायड्रोजनचीही निर्मिती करण्यास इच्छुक आहे. ज्याला आटोमोबाईल इंधनाच्या स्वरुपात वापरता येणार आहे.
इलेक्ट्रीक वाहन स्वस्त होणार?
रिलायन्सने बॅटरी प्लान्ट टाकल्यावर देशातील इलेक्ट्रीक वाहनांची किंमत कमी होईल. देशात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीची भागिदारी 80 टक्के आहे. त्यातही जर कमीत कमीत गुंतवणुक आणि सहज चार्जिंग सिस्टीम उपलब्ध झाले तर वाहनांच्या किमती कमी होतीलच, शिवाय वापरही वाढेल.