मुंबई (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – फ्युचर रिटेल लिमिटेडने बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रिजवर जबरदस्तीने स्टोअरचा ताबा मिळविल्याचा आरोप केला आहे. कोणतेही रिटेल युनिट आरआयएल ग्रुपने सुपूर्द केले नाही, असा खुलासा फ्युचर ग्रुपने केला आहे. फ्युचर रिटेलने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉनतर्फे अनेक माध्यमांमध्ये तसेच सार्वजनिक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, फ्युचर रिटेल लिमिटेडने लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत एफआरएलची रिटेल मालमत्ता रिलायन्सकडे सुपूर्द केली आहे. हे वास्तवात चुकीचे आहे. फ्युचरने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, एफआपएलने स्टोअर रिलायन्सकडे सुपूर्द केलेले नाहीत.
कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या कंपनीच्या माहितीनुसार, रिलायन्सने कंपनीची दुकाने एकतर्फा ताब्यात घेतल्याने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत, असा सूर एफआरएल संचालक मंडळाच्या दोन बैठकांमध्ये उमटला आहे. एफआरएलच्या दुकानांवर ताबा मिळविण्याच्या या प्रयत्नांमुळे भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर सकारात्मक दृष्टिकोन जटिल बनवला आहे, असे एफआरएलने शेअर बाजाराला सूचित केले आहे.
रिलायन्स रिटेलने फेब्रुवारीच्या सुरुवातीला एफआरएलच्या किमान ३०० दुकानांचे कामकाज आपल्या नियंत्रणात घेतले होते. त्यात कर्मचाऱ्यांना नोकरी देऊ केली होती. बियान समुहाच्या मालकांनी भाडे न चुकवल्यामुळे रिलायन्स रिटेलने हे पाऊल उचलले होते.
एफआरएलच्या माहितीनुसार, कंपनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने रिलयान्स समुहाच्या या कारवाईवर कठोर आक्षेप घेतला आहे. रिलायन्स समुहाने गेल्या काही दिवसात केलेल्या कारवाईबाबत पुनर्विचार करण्याच्या सूचनाही एफआरएलने नोटिशीत केल्या होत्या.
अॅमेझॉन इंकने रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपवर फसवणुकीचा आरोप केला आहे. प्रमुख वर्तमानपत्रात कंपनीने जाहिरात दिली आहे. त्यामध्ये भारतातील संवैधानिक न्यायालये, मध्यस्थ न्यायाधिकरण आणि भारतीय वैधानिक प्राधिकरणांची फसवणूक करून हे काम गुप्त पद्धतीने करण्यात आले आहे, असे म्हटले आहे.
कोरोना महामारीपूर्वी फ्युचर ग्रुपने भारतात किरकोळ किराणा बाजाराची साखळी चालवली. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या उद्योगासमोर आव्हान निर्माण झाले होते. फ्युचरजवळ १७०० हून अधिक आउटलेट्स आहेत. त्यापैकी बहुतांश आउटलेट्सना कंपनी पेमेंट्स देण्यास असमर्थ ठरली.