मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात ७०च्या दशकातील सर्वांच्या आवडीचं कॅम्पा कोला ब्रँडचे सॉफ्ट ड्रिंक आता नव्याने बाजारात लॉन्च होणार आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला ब्रँड खरेदी केला आहे. नवी दिल्ली स्थित प्यूअर ड्रिंक्स ग्रूप रिलायन्सने २२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
अंबानींना आता सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात एन्ट्री करायची आहे. त्यासाठी ‘कॅम्पा कोला’ हा अतिशय उत्तम मार्ग ठरेल हे अचूक हेरुन अंबानींनी ‘कॅम्पा कोला’ बनवणाऱ्या कंपनीची खरेदी केली आहे. कॅम्पा ब्रँडसह रिलायन्स समूहाने सॉफ्ट ड्रिंक ब्रँड Sosyo देखील आपल्या ताब्यात घेतला आहे. प्यूअर ड्रिंक्स ग्रूप अंतर्गत ‘कॅम्पा कोला’ हे सॉफ्ट ड्रिंक तयार केलं जातं होतं. ‘कॅम्पा ब्रँड’ आणि ‘कॅम्पा कोला’ हे १९७० आणि १९८० च्या दशकात दोन लोकप्रिय शीतपेय ब्रँड होते. १९९०च्या दशकात ‘कोका-कोला’ आणि ‘पेप्सिको’च्या प्रवेशानंतर या ब्रँडची लोकप्रियता कालांतराने कमी झाली होती.
रिलायन्स रिटेल आता या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोला, लिंबू आणि ऑरेंज फ्लेवर्समधील सॉफ्ट ड्रिंक्स पुन्हा लॉन्च करणार आहे. सुधारित कॅम्पा ब्रँड आता शीतपेयांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य अशा पेप्सी आणि कोका-कोलाला टक्कर देऊ शकतो. नवीन उत्पादन देशभरातील रिलायन्स रिटेल स्टोअर्स, जिओमार्ट आणि किराणा स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे.
मुंबईमधील पेय पदार्थ उत्पादक प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा १९४९ ते १९७० पर्यंत भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता. १९७०च्या दशकात या कंपनीने स्वतःचा ब्रँड ‘कॅम्पा कोला’ लाँच केला. अल्पावधीच सॉफ्ट ड्रिंक्स क्षेत्रात कॅम्पा कोलाने आपली मजबूत पकड निर्माण केली होती. कॅम्पाने ऑरेंज फ्लेवर सॉफ्ट ड्रिंक लॉन्च करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. कॅम्पा कोला एक भारतीय ब्रँड असून ‘द ग्रेट इंडियन टेस्ट’ असं या सॉफ्ट ड्रिंकचं घोषवाक्य होतं. या ग्रुपचे मुंबई आणि दिल्ली येथे दोन बॉटलिंग प्लांट होते. भारत सरकारने १९९० साली उदारीकरणाची भूमिका घेतल्यानंतर या क्षेत्रात जगाची दारं पुन्हा उघडी झाली आणि कॅम्पा कोलाचा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला. ज्यामुळे पेप्सिको आणि कोका-कोला सारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला.
२९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी कंपनीची रिटेल शाखा FMCG विभागात प्रवेश करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, भारतीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी उच्च-गुणवत्तेची, परवडणारी उत्पादनं विकसित आणि वितरीत करण्याच्या उद्देशाने FMCG व्यवसाय सुरू करणार आहे.
Reliance Ambani Pepsi Coca Cola Buy New Company
Indian Brand Campa Cola