नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांना काय हवं आहे, हे नेमकेपणाने ओळखून त्याप्रमाणे आपल्या प्लॅन्समध्ये बदल, सुधारणा करणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ आणि एअरटेल आघाडीवर आहेत. आता तर या दोन्ही कंपन्या एका करारान्वये एकत्र येणार आहेत. या स्पेक्ट्रम ट्रेडिंग डीलअंतर्गत आंध्र प्रदेश, मुंबई आणि दिल्लीत ८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये स्पेक्ट्रमचे अधिकार खरेदी केले आहेत. यामुळे या तीन शहरांतील जिओ युझर्सना अजून चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
जिओ आणि एअरटेलदरम्यान झालेल्या या कराराचे एकूण मूल्य १ हजार ४९७ कोटी एवढे आहे. आंध्र प्रदेशात ३.७५, दिल्लीत १.२५ आणि मुंबईत २.५० मेगाहर्ट्ज अतिरिक्त स्पेक्ट्रमचा वापर करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना यापूर्वीच्या तुलनेत चांगली सेवा मिळणार आहे.
जिओ आणि एअरटेलच्या या स्पेक्ट्रम डीलअंतर्गत जिओ एअरटेलला १ हजार ३७ कोटी देण्यात येतील. दूरसंचार विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून हा व्यवहार करण्यात आला आहे.
जिओ आणि एअरटेलमध्ये झालेल्या या व्यवहारानंतर जिओ युझर्सना चांगली सेवा मिळणार आहे. पण आंध्र प्रदेश, मुंबई आणि दिल्लीतीलच युझर्सना हा फायदा मिळणार आहे. एअरटेलचे एमडी आणि सीईओ (भारत, दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, या तीन सर्कलमध्ये ८०० मेगाहर्ट्ज ब्लॉक्सच्या विक्रीमुळे कंपनीला फायदा होणार आहे. हा व्यवहार म्हणजे पूर्णपणे नेटवर्क स्ट्रॅटेजी आहे. तर जिओच्या म्हणण्यानुसार, या स्पेक्ट्रम व्यवहारानंतर रिलायन्सची नेटवर्क क्षमता अधिक सक्षम होणार आहे.