मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात आज एकच चर्चा आहे. ती म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची. दरवर्षी या सभेमध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी मोठी घोषणा करीत असतात. त्यामुळे संपूर्ण जगाचे त्याकडे लक्ष असते. आजच्या या सभेत मुकेश अंबानींनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होत आहे. दुपारी २ वाजता ही सभा सुरू झाली.
जिओ एअर फायबरची प्रतीक्षा संपली
जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे, गणेश चतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जिओ एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, “१० दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो परिसर आहेत जिथे वायर जोडणे अवघड आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करेल. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत. Jio Air Fibe लाँच केल्यामुळे, जिओ दररोज दीड लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल.”
अंबानी म्हणाले की, तुम्ही स्मार्टफोनवरून जिओ होम नेटवर्क नियंत्रित करू शकाल. एआय पॉवर्ड तंत्रज्ञान तुम्हाला यामध्ये मदत करेल आणि तुम्हाला संशयास्पद लिंक्सबद्दल चेतावणी देईल. Jio Home च्या माध्यमातून तुम्ही घरातील लोक आणि पाहुण्यांसाठी वाय-फाय ऍक्सेस ब्लॉक करू शकता किंवा त्यांना ऍक्सेस देऊ शकता. Jio Home अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनचा गेम कंट्रोलर म्हणूनही वापर करू शकता. जिओ होमच्या फोटो फीचरच्या माध्यमातून तुम्हाला जुने संस्मरणीय फोटो कुठेही पाहता येतील. जिओ होमच्या माध्यमातून तुम्ही घरात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील अॅक्सेस करू शकाल, असे अंबानींनी स्पष्ट केले.
नीता अंबानींचा राजीनामा, आकाश, अनंत आणि ईशा यांच्यावर नवी जबाबदारी
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना कंपनीने गेल्या वर्षभरात उचललेली महत्त्वाची पावले आणि आगामी वर्षांतील कंपनीच्या योजनांची माहिती दिली. कंपनीने आपल्या ४६ व्या एजीएममध्ये बोर्डात मोठे बदल जाहीर केले आहेत. नीता अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या बदलाला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. बोर्डातील या बदलाबाबत कंपनीने एक्सचेंजेसना सांगितले की, आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच बोर्डाने नीता अंबानी यांचा राजीनामाही स्वीकारला आहे. रिलायन्स फाऊंडेशनला अधिक वेळ देण्यासाठी नीता अंबानी यांनी रिलायन्स बोर्डाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुकेश अंबानी म्हणाले – रिलायन्सने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) वर विक्रमी १२७१ कोटी रुपये खर्च केले. आर्थिक वर्ष २३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकत्रित महसूल ९.७४ लाख कोटी होता. या कालावधीत कंपनीचा EBITDA १.५३ लाख कोटी इतका होता. आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनीचा नफा ७३,६७० कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजने CSR वर विक्रमी १२७१ कोटी रुपये खर्च केले. यावेळी कंपनीने २.६ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या.
Reliance AGM Mukesh Ambani Key Announcement
Industry Jio 5G Smartphone