इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी यांनी भारत सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये केलेल्या दुसऱ्या पिढीतील सुधारणा स्वागतार्ह असल्याचे सांगितले.
अंबानी यांनी या ऐतिहासिक सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीयांसाठी दिलेले “दिवाळी गिफ्ट” असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “जीएसटी सुधारणा या ग्राहकांसाठी उत्पादने व सेवा अधिक किफायतशीर करण्याच्या, व्यापारातील गुंतागुंत कमी करण्याच्या, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि किरकोळ क्षेत्रातील उपभोग वाढविण्याच्या दिशेने एक प्रगतिशील पाऊल आहे. यामुळे भारताच्या आर्थिक वृद्धीला वेग मिळेल. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर 7.8% इतका झाला आहे आणि नव्या सुधारणा अर्थव्यवस्थेला आणखी गती देऊन वृद्धीदर दोन अंकी आकड्याच्या जवळ नेऊ शकतात.”
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “नवी जीएसटी व्यवस्था हा परिवर्तन घडवणारा निर्णय आहे. यामुळे प्रत्येक भारतीय घरात दिलासा पोहोचेल आणि उद्योग क्षेत्रासाठी अनुपालन सुलभ होईल. याचा लाभ ग्राहक आणि व्यवसाय या दोघांनाही होणार आहे. रिलायन्स रिटेल पहिल्याच दिवशी नव्या जीएसटी व्यवस्थेचा पूर्ण फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास वचनबद्ध आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, जेव्हा जेव्हा खर्च कमी होईल तेव्हा त्याचा थेट फायदा ग्राहकांनाच व्हायला हवा.”
भारताचा सर्वात मोठा किरकोळ विक्रेता म्हणून रिलायन्स रिटेलने म्हटले आहे की, या परिवर्तनात आघाडीवर राहण्याचा आम्हाला अभिमान आहे. देशातील १.४ अब्ज लोकांपर्यंत सुधारणा पोहोचवणे आणि अधिक सर्वसमावेशक, स्पर्धात्मक तसेच परवडणारी उपभोग अर्थव्यवस्था घडवण्यात योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जीएसटी सुधारणा भारतासाठी एक निर्णायक क्षण आहे. यामुळे खर्च कमी होईल, महागाई नियंत्रणात राहील, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला चालना मिळेल. याचा थेट फायदा शेतकरी, सूक्ष्म-मध्यम उद्योग, उत्पादक, पुरवठादार, किराणा दुकानदार आणि अंतिम ग्राहकांना मिळणार आहे.