पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या १ एप्रिल पासून सुरू झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा 31 जुलै 2022 रोजी संपुष्टात येत असल्याने थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती यासंबंधी पक्षकांराना 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस प्राप्त झाल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल, अशा पक्षकारांनी मुद्रांक शुल्क योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
संबंधित पक्षकारांनी 31 जुलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्याचा म्हणजे थकित शास्तीवरील 90 टक्के सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकिम शास्तीवर 50 टक्के दंड भरावा लागेल.
योजनेचे स्वरुप : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलमान्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरीता ही माफी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
ही योजना 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत (8 महिने ) कार्यान्वित राहणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली असून 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत 90 टक्के सूट मिळेल, तर 1 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट मिळेल.
योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाच्या 8888007777 या कॉल सेंटरवर किंवा complaint@igrmaharashtra.gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Registration and Stamp Fee Fine Waiver Scheme IGR Maharashtra