नवी दिल्ली – केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री (डीओएनईआर) जी.किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण येथे ‘विजय आणि शौर्याची स्मारके’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी या संस्कृती राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मृतींप्रित्यर्थ साजरा करण्यात येत असलेल्या ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’चा एक भाग म्हणून विजय आणि शौर्याच्या स्मारकांवरील प्रदर्शन राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणामध्ये भरविण्यात आले आहे. जी किशन रेड्डी म्हणाले, “आपला इतिहास साहस आणि शौर्याच्या गाथांनी परिपूर्ण आहे. ज्यांनी ते दिवस पाहिलेले नाहीत किंवा वसाहतवादी विचारसरणीने पाहिले त्यांनी ढोबळपणे चुकीचे वर्णन केले आहे. आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील ढोबळ चुकांची मांडणी दुरुस्त केली जाईल, असेही ते म्हणाले.
सविस्तर प्रदर्शन पाहिल्यानंतर माध्यमांना संबोधित करताना , जी किशन रेड्डी म्हणाले की, आज आपण स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण केली आहेत आणि ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे त्यामुळे आज १३० कोटी भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. विविध संस्थांमार्फत सरकार देशाचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याच्या दिशेने काम करत आहे आणि शौर्य स्मारकांवरील हे प्रदर्शन याच ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, यावर त्यांनी भर दिला. जी. किशन रेड्डी यांनी देशाची कला, संस्कृती, सभ्यता मूल्ये जाणून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संस्कृती मंत्रालय या उद्दिष्टाच्या दिशेने काम करत आहे.