नवी दिल्ली – दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला हा भलेही देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जातो. परंतु एका महिलेने यावर हक्क सांगून उच्च न्यायालयात याचिक दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महिलेने मुघल शासक बहादूर शाह जफरच्या पणतूची आपण विधवा असल्याचा दावा केला होता. ती कायदेशीर वारस असल्याच्या नात्याने तिने लाल किल्ल्यावर मालकी हक्क सांगितला. परंतु न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली.
याचिकाकर्ता सुल्ताना बेगम म्हणाल्या, की त्या बहादूर शाह जफर यांचे पणतू मिर्जा मोहम्मद बेदार बख्त यांच्या पत्नी आहे. त्यांचे २२ मे १९८० रोजी निधन झाले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अवैधरित्या लाल किल्ला ताब्यात घेतला होता. ईस्ट इंडिया कंपनीने मुघल शासकांकडून मनमानी पद्धतीने जबरदस्तीने त्यांचे अधिकार हिसकावून घेतले होते, असा दावा त्यांनी केला.
न्यायालय काय म्हणाले
याचिका फेटाळताना न्यायमूर्ती रेखा पल्ली यांचे एकल खंडपीठ म्हणाले, की १५० हून अधिक वर्षांनंतर न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. याचे कोणतेही औचित्य नाहीय. माझे इतिहासाचे ज्ञान खूपच कमकुवत आहे. परंतु तुमच्या दाव्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ मध्ये तुमच्यासोबत अन्याय केला. तेव्हा ही मागणी करण्यासाठी १५० वर्षांची वाट का पाहावी लागली? इतकी वर्षे तुम्ही काय करत होत्या? अशा प्रकारे महिलेचा रोचक दावा न्यायालयाने फेटाळून लावला.