विशेष प्रतिनिधी, मुंबई
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी मोठी खुषखबर आहे. देशभरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तब्बल ५ हजार ८५८ जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आजपासून अर्ज करु शकतात.
आयबीपीएस लिपीक २०२१ भरती प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीयकृत सरकारी बँकांमध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इतर बँकांमध्ये लिपिक संवर्ग पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
आयबीपीएस लिपिकच्या अधिसूचनेनुसार, यावर्षी कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेसच्या माध्यमातून एकूण ५ हजार ८५८ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार विविध बँकांमध्ये आज (१२ जुलै) पासून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांना ८५० रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल. आयबीपीएस लिपिक भरती वेळापत्रकानुसार प्राथमिक परीक्षा प्रशिक्षण १६ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. प्राथमिक परीक्षा २८ व २९ ऑगस्ट रोजी तर ४ सप्टेंबरला अंतिम परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवार ibpsonline.ibps.in च्या अर्जासाठी पोर्टलला भेट देऊन नोंदणी करू शकतात. या पोर्टलला भेट दिल्यानंतर उमेदवारांना प्रथम नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. यानंतर नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचा तपशील नोंदणीसाठी भरावा लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्दाद्वारे लॉग इन करून, उमेदवार आपला आयबीपीएस लिपिक २०२१ ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकेल. लिपिक केडर पदावर भरतीसाठी सदर अधिसूचना जारी केली आहे.