विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यापासून हिंमतीने या संसर्गावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. याच कोरोनामुक्त झालेल्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात आज मोठे स्पष्टीकरण दिले आहे. डॉ. गुलेरिया यांचे म्हणणे आहे की, कोरोना मुक्त झाल्यानंतरही अशा व्यक्तींची दीर्घकाळ काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या शरीरात काही बदल होत आहेत का किंवा त्यांना काही त्रास होतो आहे का, हे पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच, कोरोना मुक्तीनंतरही दीर्घकाळ अतिशय काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, देशात आता कोरोनामुक्ती पश्चात उपचारांची (पोस्ट कोविड ट्रिटमेंट) व्यवस्था करणे अगत्याचे बनल्याचे ते म्हणाले.
कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक जण बऱ्याच बाबी पाळत नाहीत. किंवा आता आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असेही त्यांना वाटते. सद्यस्थितीत मधुमेह असलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना काळ्या बुरशीचा आजार होत आहे. देशभरात याचे चिंतेचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे की, कोरोनामुक्तीनंतरही आपण अतिशय सजग असले पाहिजे. अशा व्यक्तींवर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि काळजी घ्यायला हवी. उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण घरी जातात आणि त्यांना पुन्हा त्रास होत आहे, काहींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत आहे तर काहींना अन्य लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे कोरोनावर आपण अद्यापही पूर्णपणे मिळविलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे. सलग काही आठवडे कोरोनामुक्त रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता बरे झालेल्या रुग्णांसाठीही विशेष उपचाराची व्यवस्था करावी लागणार आहे. सद्यस्थितीत आपण कोरोनावर उपचार देणारी यंत्रणा राबवित आहोत. पण, बदलती परिस्थिती लक्षात घेता आता कोरोनामुक्ती पश्चातही उपाचार घेणाऱ्यांची संख्या वाढू शकते, असेही ते म्हणाले.