मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मध्य प्रदेशातील सिवनी येथील दक्षिण सिवनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई केली. या कारवाईत वन्य प्राण्याची नऊ नखे, एकसष्ट हाडे आणि एका वाघाच्या बछड्याच्या कुजलेले शव जप्त करण्यात आले . काही व्यक्तींच्या गटाने एका वाघाच्या पिल्लाला मारले आणि नंतर त्याचा मृतदेह सारेखा खुर्द गावाजवळील जंगली भागात पुरला, अशी माहिती मिळाल्यावर पथकाने कारवाई केली. वन्यजीव संरक्षण कायद्यांचे उल्लंघन करून वाघाच्या शरीराचे अवयव विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा व्यक्तींना अधिकाऱ्यांनी हटकले.
या प्रकरणामध्ये जप्त केलेल्या वन्यजीव वस्तू आणि सहा जणांना अटक करण्यात आली आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी मध्य प्रदेशातील सिवनी येथील वन विभागाच्या बारघाट रेंजकडे सोपवण्यात आले. वाघांना या कायद्याच्या अनुसूची १ मध्ये सूचीबद्ध केले आहे.या कायद्यानुसार वाघाची नखे, हाडे आणि कातडीसह त्याच्या शरीराच्या अवयवांचा व्यापार, विक्री, खरेदी करणे किंवा या सर्व गोष्टी कुणीही ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे.
डीआरआय मुंबईने जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्रातील अकोला येथे केलेल्या जप्तीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.विभागाकडून जानेवारीमध्ये एक बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली होती आणि तीन जणांना अटक करण्यात आली होती. तसेच मे २०२५ मध्ये आणखी एक कारवाई मध्य प्रदेशातील उज्जैन येथे करण्यात आली होती, यामध्ये दोन बिबट्यांची कातडी जप्त करण्यात आली होती आणि दोन जणांना अटक करण्यात आली होती.