त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अधिक श्रावण महिण्याचे अवघे तीन दिवस शिल्लक असतांना रविवारची सार्वजनिक सुटी साधत भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कुंभमेळा पर्वणीची आठवण यावी अशी भाविकांनी रेकॅार्ड ब्रेक गर्दी केली. सकाळपासूनच भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दोनशे रुपये देणगी दर्शनाची रांग थेट डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत गेली होती. त्यामुळे काही कालावधीनंतर देणगी दर्शन बंद करण्यात आले.
त्याचप्रमाणे धर्मदर्शन मंडपातील सर्व रांगा फुल होऊन दर्शन रांग एक किलोमिटर लांब पोहोचली होती. धर्मदर्शन रांगेतुन दर्शनासाठी सहा ते सात तास कालावधी लागत होता. नगरपरिषदेचे वाहनतळ बांधुन तयार आहे. मात्र उद्घाटना अभावी बंद असल्याने भाविकांनी आपली वाहने जेथे जागा मिळेल तेथे लावली होती. त्यामुळे भाविकांच्या वाहनांचा वेढा शहराला पडला होता. मंदिराच्या पुर्व दरवाजाच्या बाजुला रिंगरोडवर बडा उदासी आखाड्यापासुन ते थेट निरंजनी आखाड्या पर्यंत रस्त्याची एक बाजु वाहनांनी भरुन गेली होती. तर दुसर्या बाजुने दर्शनाची रांग लागली होती. यामधून भाविकांची वाहने येत होती. यामुळे ठिकठिकाणी रहदारीची कोंडी होत होती.
रस्त्याने पायी चालणेही अवघड होऊन बसले होते. तर त्र्यंबक नाशिक व जव्हार रस्त्यावर दुतर्फा एक किलोमिटर पर्यत वाहने उभी करण्यात आली होती. नगर परिषद, पोलीस प्रशासन व देवस्थान ट्रस्ट यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आल्याने याचा त्रास भाविकांसह स्थानिक नागरीकांना सहन करावा लागला. भगवान त्र्यंबकराजाला रुद्राभिषेक पुजा करण्यासाठीही मंदिराच्या सभामंडपात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कुंभमेळा शाही पर्वणी दिवसाची आठवण यावी अशी गर्दी भाविकांनी कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी केली होती. शेकडो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षणा केली. पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Record breaking rush of devotees to see Trimbakeshwar