जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत “नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे” ही योजना राबविली जाते. या योजनेतंर्गत शाळांचे गुणांकन करून शासनाकडून प्रतिविद्यार्थी अनुदान दिले जाते.
जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, पळसखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव या शाळेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या शाळेची मान्यता आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे.
त्यानुसार शाळेत शिक्षण घेणाऱ्या 288 विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित शाळांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता 2 रीतील 30 विद्यार्थ्यांचे समायोजन लिटील टॉली प्री-प्रायमरी व बालविकास प्रायमरी, कासोदा ता.एरंडोल येथे करण्यात आले आहे तर इयत्ता 3 रीतील 48 विद्यार्थी मिमोसा इंग्लिश मिडीयम स्कूल, चोपडा येथे समायोजन करण्यात आले आहेत.
तसेच, इयत्ता 4 थी मधील 29 विद्यार्थ्यांचे समायोजन सुरेशचंद बी. संचेती इंटरनॅशनल स्कूल, उजाण ता. एरंडोल येथे तर इयत्ता 5 वीतील 44 व इयत्ता 7 वीतील 97 विद्यार्थी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल, शेवगाव तर नेवासा, जि.अहिल्यानगर येथे तर इयत्ता 9 वीतील 40 विद्यार्थी बियाणी इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ येथे समायोजन करण्यात आले आहेत.
याप्रमाणे एकूण 288 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता तात्काळ समायोजन पूर्ण करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे तात्काळ प्रवेश समायोजित शाळांमध्ये करून घ्यावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा संबंधित शाळांमध्ये नियमितपणे सुरु राहतील.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असून पालकांनी यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.