इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तांतर महानाट्य सुरू आहे. सर्व राज्याचे लक्ष आसामच्या गुवाहाटीतील पंचतारांकीत हॉटेलकडे लागले आहे. कारण याच हॉटेलमध्ये सर्व शिवसेना बंडखोर एकत्र जमले आहेत. या सर्व बंडखोरांचे हॉटेलचे बील, त्यांचे गुजरातमधील सूरत येथे जाणे, सूरत ते गुवाहाटी हा विमानाचा खर्च हा लाखोंच्या घरात आहे. हा खर्च सध्या कोण करतंय. बंडखोरांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे की त्यांना छुपे समर्थन देणारा भारतीय जनता पक्ष? याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर प्रथम गुजरातमधील सूरत शहरात काही काळ थांबले. त्यानंतर हे सर्व जण आसामच्या गुवाहटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. हॉटेलमधील मुक्कामाचा आणि खाण्याचा अंदाजित खर्च दररोज ८ लाख रुपये असल्याचे समजते. तसेच या हॉटेलमधील ७० खोल्या सात दिवसांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. म्हणजेच बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये ७ दिवस राहण्याचा आणि खाण्याचा खर्च सुमारे ५६ लाख रुपये आहे.
रॅडिसन ब्लू हे फाईव्ह स्टार हॉटेल असून त्यामध्ये एकूण १९६ रुम आहेत. त्यापैकी ७० रुम सेना बंडखोर आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक करण्यात आल्या आहेत. आता या हॉटेलमध्ये कोणतीही नवीन बुकिंग करण्यात येत नसून कोणत्याही नवीन व्यक्तीला प्रवेश देण्यात येत नाही. या आधी ज्या कॉन्फरन्स आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यांचे बुकिंग आधीच करुन ठेवण्यात आले होते, ते सर्व बुकिंग रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे सुरतमधील खर्च, या सर्व आमदारांना विशेष विमानाने गुवाहाटीला आणणे, इथे त्यांची ठेवण्यात येणारी बडदास्त या सर्वांचा आतापर्यंतचा खर्च कुणालाही माहिती नाही, आणि हा सर्व खर्च कोण करते आहे, हे सुद्धा उघड झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हा प्रश्न उपस्थित केला आहे. हा खर्च कोण करते? त्याचे नियोजन कोणाकडे आहे? हे देखील कोणालाच माहित नसल्याचे पाटील म्हणाले.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलमध्ये सध्या सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. गुवाहाटी पोलिसांनी हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. नजिकच्या जलुकबारी पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांसह, राखीव बटालियन आणि आसाम पोलिसांच्या कमांडो युनिट्सचे १२ कर्मचारी हॉटेलवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सदर हॉटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे १५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, सेना बंडखोरांवर कोट्यवधी रुपये खर्च होणार असून सत्ता प्राप्तीसाठी हा खर्च होत असल्याचे बोलले जात आहे.
rebel shivsena mla hotel expenses who is sponsor maharashtra political crisis