नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रामधील राजकीय सत्तासंघर्षामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. तसेच, या नोटिसीला आता या तिघांनाही उत्तर द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर याप्रकरणी आता न्यायालयात पुढील ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व जण गेल्या सहा दिवसांपासून गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. आमच्याकडे संख्याबळ असून महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे बंडखोर गटाने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयास सांगितले आहे. तसेच, उपसभापती झिरवाळ यांनी १६ आमदारांना दिलेली नोटिस बेकायदा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने विचारले की आपण सर्वप्रथम उच्च न्यायालयात का गेला नाहीत, थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात. त्यावर शिंदे गटाच्या वकीलांनी सांगितले की फ्लोर टेस्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अल्पमतात आलेले मंत्रिमंडळ हे सध्या आमच्या घरांवर हल्ले करीत आहे. शिवाय आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. आमचे हक्क बजावण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये जाण्यास तयार आहोत. पण, तेथे सध्या सुरक्षित वातावरण नाही, असे वकीलांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षाच्यावतीने अभिनेष मनू सिंघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. झिरवाळ यांनी बंडखोरांना दिलेल्या नोटिशीचे जाहीर वाचन यावेळी करण्यात आले. बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत अपात्र करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. झिरवाळ, चौधरी आणि प्रभू यांनी येत्या ५ दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही न्यायालयाने निर्देश दिले.
rebel Shivsena mla petition hearing supreme court order Maharashtra Political Crisis