मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवे सरकार स्थापनेसाठी भाजप आणि सेना बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या मूळ गटाचे काय होणार? ते कोणता निर्णय घेणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आता यासंदर्भात बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.
केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागणे ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना लवकर निर्णय घेण्यासाठी आग्रह करत होतो. मात्र त्यांनीच वेळ लावला. यासाठी आमचेच काही नेते जबाबदार आहेत. विशेषतः संजय राऊत यांच्यामुळे हे सारे घडले आहे, असा आरोपही केसरकर यांनी केला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंकडे असलेल्या १४ आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेनेतील १४ आमदार आणि आम्ही हे वेगळे नाहीत. आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना अपात्र करायचा की नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे.
आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत. परंतु आम्हाला जर कोणी डुक्कर, कुत्रा म्हणत असेल किंवा आमच्या आई, बहिणींना शिव्या देत असेल तर मग कसे आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला. आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही तथाकथित नेत्यांनी लांब केले. आता अंतर वाढले आहे, त्यांना तेव्हा आम्ही जवळचे वाटत नव्हतो तर राष्ट्रवादी जवळची वाटत होती. त्यामुळेच हे सर्व काही घडले, असेही केसरकर म्हणाले. दरम्यान, बंडखोर आणि ठाकरे यांच्यामध्ये संजय राऊत हे मध्यस्थी करतील अशी शक्यता दिसत नाही.
Rebel MLA Shinde group threat to Aditya Thackeray and other 14 MLA